Sun Nov 24 13:08:52 IST 2024
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले असून निकालाला आव्हान देत विस्कॉन्सिन राज्यातील मतांची होणार असलेली फेरमोजणी हाच एक घोटाळा असल्याचा आरोप केला.
मला पेनसिल्व्हानियात ७० हजारपेक्षा जास्त मते मिळाली आहेत, असे ट्रम्प म्हणाले. क्लिंटन या विस्कॉन्सिनमध्ये २० हजार, पेनसिल्व्हानियात ७० हजार तर मिशगनमध्ये १० हजार मतांनी पराभूत झाल्या. मतांची फेरमोजणी होण्यासाठी ग्रीन पार्टीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार जील स्टीन यांनी पुढाकार घेतला आहे. त्या पेनसिल्व्हानिया आणि मिशिगन मतदारसंघातील मतांची पुन्हा मोजणी करण्यासाठीही आग्रही आहेत. पेनसिल्व्हानिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिन येथे ट्रम्प यांना अतिशय निसटता विजय मिळा आहे. ट्रम्प यांनी ते विजयी व्हायच्या आधीपासूनच या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. आता मात्र निवडणूक निकालाला आव्हान न देता त्याचा आदर राखला गेला पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे.
फेरमतमोजणीच्या कामासाठी स्टीन यांनी ५.९ दशलक्ष डॉलर जमवले असून त्यांचे लक्ष्य ७ दशलक्ष डॉलरचे आहे. हे पैसे त्या स्वत:च्या खिशात घालणार आहेत, असा आरोप ट्रम्प यांनी केला. विस्कॉन्सिन राज्यातील मतमोजणी पुन्हा करावी असा स्टीन यांनी केलेला अर्ज निवडणूक आयोगाने स्वीकारला आहे. ग्रीन पार्टीने केलेल्या फेरमतमोजणी मागणीसाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे शनिवारी हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारमोहिमेने म्हटले होते. मिशिगन आणि पेनसिल्व्हानियामध्येही फेरमोजणीच्या मागणीलाही आमचा पाठिंबा असल्याचे मोहिमेने म्हटले. इलेक्टोरेल कॉलेजची मते ट्रम्प यांनी खात्री वाटेल अशी जिंकली आहेत व क्लिंटन यांना दोन दशलक्षपेक्षा जास्त मते मिळाल्याचे मोजणीत सूचित होत होते. एकूण मतांमध्ये स्टीन यांना एक टक्क्यापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. अनेक राज्यांत त्यांना एकही मत मिळाले नाही. जमा केलेले पैसे हे फेरमतमोजणीसाठी वापले जाणार नसल्याचा ट्रम्प यांचा आरोप ग्रीन पार्टीने अमान्य केला.