Sun Sep 14 06:24:23 IST 2025
बैरूत : सीरियातील युद्धात आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त लोक ठार झाले आहे. या देशाची अर्धी लोकसंख्या निर्वासित झाली आहे. या युद्धात संपूर्ण देश बेचिराख झाला आहे.
द सीरियन आॅब्झर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्स या ब्रिटनस्थित संस्थेने ही माहिती जारी केली आहे. संस्थेने म्हटले की, मार्च २0११ मध्ये सिरियात सरकारविरोधी बंडाला सुरुवात झाली. गेल्या आठवड्यापर्यंत त्यात ३,१२,00१ लोक मारले गेले आहेत. मृतांमध्ये १६ हजार मुलांसह ९0 हजार सामान्य नागरिकांचा समावेश आहे. युद्धापूर्वी सीरियाची लोकसंख्या २३ दशलक्ष होती. त्यापैकी सुमारे ६.६ दशलक्ष लोक विस्थापित झाले असावेत, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे. याशिवाय सुमारे १0 लाख लोक युद्धग्रस्त भूभागात अडकून पडले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांचे मदत प्रमुख स्टीफन ओब्रेन यांनी म्हटले आहे. सीरियातील सरकारी फौजांकडूनही मोठ्या प्रमाणात क्रूरपणाच्या कारवाया केल्या जात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित विषयक उच्चायुक्तांनी सांगितले की, युद्धग्रस्त सीरियामधून ४८ लाख लोक पळून गेले आहेत. २७ लाख सीरियाई नागरिकांना शेजारील तुर्कस्तानने आश्रय दिला आहे.
याशिवाय जॉर्डनमध्ये ६,५५,000, इराकमध्ये २,२८,000, इजिप्तमध्ये १,१५,000 सीरियाई नागरिकांनी आश्रय घेतला आहे. आॅगस्टमध्ये अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने सिरियाई सरकारवर क्रूरपणे छळ चालविल्याचा आरोप केला आहे. विशेषत: तुरुंगात हा छळ केला जात आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून तुरुंगात १७,७00 लोक मरण पावल्याचे अॅम्नेस्टीने म्हटले होते. हा आकडा अधिकृतरीत्या समोर आला आहे. वास्तविक, हा आकडा त्यापेक्षा खूप मोठा असू शकतो, असेही अॅम्नेस्टीने म्हटले आहे.