Fri Apr 04 06:57:11 IST 2025
फ्लोरिडा : फोर्ट लॉडरडल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका माथेफिरूने गोळीबार केल्याचं वृत्त आहे. विमानतळाच्या टर्मिनल 2 परिसरात ही गोळीबाराची घटना घडली आहे. या माथेफिरूने केलेल्या गोळीबारात 8 जण जखमी झाले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येते आहे, अशी माहिती फोर्ट लॉडरडल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिका-यांनी दिली आहे. दरम्यान, गोळीबाराच्या वेळी त्या परिसरात 100हून अधिक प्रवासी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारानंतर प्रवाशांनी धावाधाव केली असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी विमानतळ खाली केलं आहे.
गोळीबार करणा-या माथेफिरूची ओळख पटली आहे. त्याचं एस्टेबॅन सँटियागो असून, त्याचा जन्म न्यू जर्सीमध्ये झाला आहे. पोलिसांनी गोळीबार करणा-या या माथेफिरूला अटक केली आहे. तसेच गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना रुग्णवाहिकेतून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विमानतळावर गोळीबार झाला त्यावेळी धावाधाव केल्याचं वृत्त व्हाइट हाऊसच्या प्रतिनिधीने दिले आहे.