Fri Apr 04 07:07:25 IST 2025
नवी दिल्ली : धर्मोपदेशक झाकीर नाईक यांची राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. नाईक यांची ७८ बँक खाती तसेच मुंबई आणि लगतच्या परिसरातील स्थावर मालमत्तेत त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांच्या १०० कोटींच्या गुंतवणुकीबाबत राष्ट्रीय तपास संस्था कसून तपास करीत आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने झाकीर नाईक व इतरांविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्यात गुन्हा दाखल केलेला आहे. आता नाईक यांच्याशी संबंधित व्यक्ती, संघटनांसह २५ संस्थांचा छडा लागला असून, आतापर्यंत नाईक यांच्या एका नातेवाईकासह २० सहकाऱ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. प्राप्तिकर रिटर्नसह काही दस्तावेज मागवले असून, देशाच्या विविध भागांतील बँकांतील ७८ खात्यांची झाडाझडती घेतली जात आहे. हा तपास पूर्ण झाल्यानंतर नाईक यांना चौकशीसाठी पाचारण केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
एनआयएच्या सूत्रांनुसार नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या भागात स्थावर मालमत्तेत १०० कोटींची गुंतवणूक केली आहे. मुंबईतील हार्मोनी मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या भूमिकेबाबतही चौकशी केली जात आहे. नाईक यांच्या आयआरएफ या संस्थेवर सरकारने बंदी घातलेली आहे.