डोनाल्ड ट्रम्प मोदींशी करणार मन की बात

2017-01-25 14:31:55.0
img

नवी दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचित करणार आहे. भारतीय वेळेनुसार, आज रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ट्रम्प पंतप्रधान मोदींसोबत फोनवरुन बातचित करणार आहेत.

यावेळी भारतासंबंधी मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चर्चेमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 20 जानेवारी रोजी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. व्हाइट हाऊसने मंगळवारी ट्रम्प यांच्या नियोजित कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार आज रात्री 11.30 वाजता त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बातचित होणार आहे.9 नोव्हेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. निवडणुकीतील त्यांच्या घवघवीत यशाबाबत मोदींनी त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी आतापर्यंत 4 देशांच्या प्रमुख नेत्यांशी बातचित केली आहे. 21 जानेवारी रोजी त्यांनी कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडी आणि मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिक पेना निटो यांच्याशी बातचित केली. तर रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नितनयाहू आणि 23 जानेवारीला मिस्रच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवरुन बातचित केली. दरम्यान, वॉशिंग्टनमधील माजी भारतीय राजदूत निरुपमा राव यांच्यानुसार, भारताने ट्रम्प आणि त्यांच्या टीमसोबत भेटीगाठीसाठी वेळ न घालवता दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

दरम्यान, अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांची कशा प्रकारची धोरणे आहेत, हे जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे भारतीय अधिका-यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाबाबत थोडासा संशय असल्याचेही अधिका-यांचे म्हणणे आहे. कारण राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट या धोरणाचा पुनरूच्चार कर अमेरिकी कर्मचारी, कामगार आणि अमेरिकी कुटुंबीयांसाठी लाभदायी निर्णय घेतले जातील, असे आपल्या भाषणात म्हटले होते.

Related Post