Fri Apr 04 07:07:24 IST 2025
नवी दिल्ली : सोव्हिएत संघाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्ष आणि काही नेत्यांना अवैधरित्या पैसा पुरवला होता, अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने(CIA) दिली आहे.
काही दिवसांपूर्वी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीद्वारे सार्वजनिक करण्यात आलेल्या गोपनीय दस्तऐवजांद्वारे ही माहिती समोर आली आहे. इंदिरा गांधी यांचे सरकार असताना त्यांच्या 40 टक्के खासदारांना सोव्हिएत संघाकडून राजकीय देगण्या मिळाल्या होत्या. यापूर्वी 2005 मध्ये रशियाच्या गुप्तचर संस्था केजीबीच्या लीक झालेल्या गोपनीय दस्तऐवजांमधूनही अशा प्रकारची माहिती उघड झाली होती. सोव्हिएत संघाच्या भारतावरील प्रभावासंदर्भात CIAच्या डिसेंबर 1985 सालातील अहवालात असे म्हणण्यात आले आहे की, राजकीय पक्ष आणि व्यक्तींना लपवून रोख रक्कम देण्याच्या निमित्ताने सोव्हिएत संघाची भारताच्या राजकीय प्रक्रियेत मोठी भूमिका आहे. अहवालानुसार, इंदिरा गांधींच्या कार्यकाळात सरकारमधील जवळपास 40 टक्के खासदारांना सोव्हिएत संघाकडून राजकीय देणगी मिळाली होती.
केजीबीचे माजी गुप्तचर वासिली मित्रोकिन यांच्या 2005 मध्ये आलेल्या पुस्तकातही अशाच पद्धतीचे दावे करण्यात आले होते. वासिली यांनी सोव्हिएत संघातून हजारो गोपनीय दस्तऐवज चोरले आणि ते देशाबाहेर गेले होते. त्या दस्तऐवजांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, काँग्रेससाठी बॅगांच्या बॅगा भरुन रोख रक्कम पाठवण्यात आली होती. तसंच केजीबीने 1970च्या दशकात माजी संरक्षण मंत्री व्ही.के.मेनन यांच्या व्यतिरिक्त चार केंद्रीय मंत्र्यांना निवडणूक प्रचारासाठी निधी पुरवला होता. सोव्हिएत संघाने भारतासोबत केलेल्या व्यापार कराराद्वारे काँग्रेस पक्षाला लाच दिली, असा आरोप CIAच्या दस्तऐवजात करण्यात आला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोव्हिएत संघाकडून निधी मिळाल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांना आर्थिक मदत केली गेली नसल्याचीही माहिती अहवालात आहे. त्यात अशा व्यक्तींच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे की ज्यांनी सोव्हिएत संघासोबत कथित व्यवहार केला. त्यावेळी सीआयएचं असे मत होते की, केजीबीकडून निधी मिळत असल्याच्या कारणाने ब-याच नेत्यांपर्यंत सोव्हिएत संघ पोहोचला होता आणि यामुळे भारतीय राजकारणात प्रभाव गाजवण्यासाठी मदत मिळाली.