Fri Apr 04 07:05:00 IST 2025
लाहोर : मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. दोन दिवसांपासून सईदला पाकिस्तान सरकारने नजरकैदेत ठेवलं आहे.
हाफिज सईदविरोधात कारवाई केली आहे, त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं असून लवकरच त्याच्याविरोधात एफआयआर दाखल कऱण्यात येईल अशी माहिती पाकिस्तान सरकारमधील मंत्री खुर्रम दस्तगिर यांनी दिली. नेमक्या कोणत्या कारणांमुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे याची माहिती त्यांनी दिली नसली तरी येत्या काही दिवसात याबाबत माहिती दिली जाईल असं ते म्हणाले. जमात-उद-दावाच्या आणखी काही सदस्यांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मंत्री राणा सनाउल्लाह यांनी दिली. पाकिस्ताननं हाफिज सईदवर फक्त दाखवण्यापुरती कारवाई न करता विश्वासार्ह कारवाई करावी, असं वक्तव्य भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विकास स्वरूप यांनी केलं होतं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद्यांविरोधात कडक पवित्रा घेतल्याने बदललेल्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीत आपण दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करत आहोत. हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.