Fri Nov 22 04:08:48 IST 2024
औरंगाबाद : एका नगरसेवकाच्या घरात सिव्हिल इंजिनिअरींगचा पेपर लिहिणार्या 26 विद्यार्थ्यांसह एका प्राध्यापकाला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीन विद्यार्थिनींचाही समावेश आहे. पोलिसांनी उत्तरपत्रिका जप्त केल्या आहेत. सुरेवाडीत शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली. गुन्हे शाखेने आज (बुधवारी) दुपारी ही कारवाई केली आहे.
शहरात विविध कॉलेजेसमध्ये असे प्रकार सर्रास घडत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. पोलिस त्या दिशेने चौकशी करत आहेत. यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. चौका येथील साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचे सुरेवाडीत एका घरात पेपर सोडवत असल्याची गोपनिय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित घरावर छापा टाकला. हे घर शिवसेनेचे नगरसेवक सीताराम सुरे यांचे आहे. बीई सिव्हिलच्या तिसर्या वर्षाचे विद्यार्थी सिव्हिल कन्स्ट्रक्शन अॅण्ड ड्रॉईंग या विषयाचा पेपर लिहित होते. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ अटक केली. यात नगरसेवकांच्या मुलाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यावेळी नगरसेवक सुरे आणि काही प्राध्यापकही तेथेच उपस्थित होते. बीई सिव्हिलच्या तिसर्या वर्षाचा सिव्हिल कन्स्ट्रक्शन अॅण्ड ड्रॉईंग या विषयाचा पेपर काल (मंगळवारी) झाला. मात्र या विद्यार्थ्यांनी केवळ एकाच प्रश्नाचे उत्तर लिहून उर्वरित उत्तरपत्रिका कोरी ठेवली होती. दुसर्या दिवशी म्हणजे आज सर्व विद्यार्थ्यांना नगरसेवक सुरे यांच्या घरी बोलावण्यात आले होते. प्राध्यापक विद्यार्थ्यांना उत्तरे सांगत होते आणि विद्यार्थी पेपर लिहित होते. यासाठी संस्थाचालक आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम घेतल्याचीही माहिती मिळाली आहे.
तपासात जे विदयार्थी आणि प्राध्यापक दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू, असे प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष अॅड.गंगाधर मुंडे यांनी दिली आहे. दुसरीकडे, या प्रकाराची आपल्याला कोणतीही कल्पना असल्याचे नगरसेवक सुरे यांनी म्हटले आहे. या घटनेची विद्यापीठाच्या परीक्षा मुल्यमापन मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. परीक्षा मंडळाचे संचालक डी.एम.नेटके आणि कुलसचिवांनी चौका येथील साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज परीक्षा केंद्राला भेट दिली. या केंद्रात 3 मेपासून आतापर्यंत झालेल्या सर्व पेपर्सबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी लवकरच समिती नेमणार असल्याचे नेटके यांनी सांगितले आहे. साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज परीक्षा केंद्राची मान्यता तातडीने रद्द करण्यात आली आहे. पुढील सर्व विषयांची परीक्षा पैठण मार्गावरील छत्रपती शाहू महाराज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती नेटके यांनी दिली आहे.