मालवणचा सुपुत्र होणार आयर्लंडचा पंतप्रधान?

2017-05-25 18:07:18.0
img

मालवण : मालवण तालुक्यातील वराड गावचे सुपुत्र आणि आयर्लंडचे विद्यमान समाजकल्याण मंत्री लिओ अशोक वराडकर यांना पंतप्रधानपदाची संधी चालून आली आहे. ३७ वर्षीय लिओ आयर्लंडचे सर्वांत तरुण मंत्री आहेत. वराडकर आता पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असून त्यांच्या नावालाच पसंती मिळत आहे.

पंतप्रधान एन्डा केनी यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी फाईन गिल पक्षात त्या पदासाठी स्पर्धा सुरु झाली असून त्यात गृहनिर्माणमंत्री सिमोन कोवेनी हे वराडकर यांचे मुख्य स्पर्धक आहेत. मात्र लिओ वराडकरांना सर्वाधिक पाठिंबा मिळत आहे. पंतप्रधानपदाची निवडणूक २ जून रोजी होत आहे. वराडकर यांनी आतापर्यंत आरोग्यमंत्रिपदासह क्रीडा, सांस्कृतिक, वाहतूक अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. मंत्री लिओ वराडकर हे व्यवसायाने डॉक्टर असून आयर्लंडच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दोन वेळा निवडून आले आहेत. लिओ यांचा जन्म वराड गावचा असला तरी गेल्या ३७ वर्षांत ते एकदाही जन्मगावी आलेले नाहीत. मात्र त्यांचे वडील डॉ. अशोक विठ्ठल वराडकर दर दोन वर्षांनी वराड (ता. मालवण) येथे सपत्नीक भेट देतात. लिओ यांना भारतात येण्याची प्रचंड इच्छा आहे.

मात्र ते आयर्लंडच्या राजकारणात भरपूर व्यस्त असतात असे वडील डॉ. अशोक वराडकर यांनी २०१३ साली सांगितले होते. लिओ अद्यापही अविवाहित आहेत. मात्र ते लिओ हे समलिंगी विवाहाचे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे आयर्लंडमध्ये तरुण वर्गात ते जास्त लोकप्रिय आहेत. कोकणच्या मातीशी नाते सांगणार लिओ वराडकर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याने जिल्हावासीयांचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे. लिओने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजकारणात पाऊल टाकले. आम्ही त्याला विरोध केला नाही. त्याच्या कर्तृत्वावर आमचा उभयतांचा विश्वास आहे. कामात व्यस्त असल्याने त्याला जन्मगावी येत येत नाही. मात्र पंतप्रधान झाल्यावर जन्मगावी येण्याची त्याची इच्छा आहे असे लिओची आई मेरियम वराडकर यांनी सांगितले.

Related Post