मुंबईत '​महिला तस्करी'वर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन  

2017-07-23 18:12:48.0
img

नागपूर : महाराष्ट्र राज्य कमिशन फॉर वुमेन (एमएससीडब्ल्यू) व इंटरनॅशनल जस्टिस मिशन इंडिया (आयजेएम) यांच्या संयुक्तविद्यमाने जुहू येथील जेडब्ल्यू मॅरिएट येथे गुरुवारपासून (ता. 27 ) 'महिला तस्करी' याविषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्याअध्यक्षा विजया रहातकर यांनी पत्रपरिषदेत दिली.

नागपूर येथे आयोजित पत्रपरिषदेत त्या म्हणाल्या, तस्करीसारखे कृत्य अत्यंत संघटित आणि नियोजनबध्द पध्दतीने कोणत्याही सीमेचे बंधन न बाळगता राबविले जात आहे. महिलांना यातून सोडविणे, सुरक्षा देणे आणि असे गुन्हे घडूच याबद्दल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय, सरकारी आणि खाजगी संस्थांचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत 300 वक्ते आणि 15 हून अधिक देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.  दोन दिवस चालणार्‍या या परिषदेत तीन पूर्ण सत्र आणि पाच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील वक्त्यांचा चर्चासत्रात समावेश असणार आहे. पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये महिला तस्करी संदर्भातील प्रत्यक्ष घडणारे गुन्हे आणि त्याचे महिलांवर होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. 27 जुलै रोजी होणार्‍या चर्चासत्रामध्ये तस्करी,महिलांवर होणारे अत्याचार व त्यामागील वास्तव आणि त्याचे परिणाम या विषयांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे. चर्चासत्रामध्ये मानवी तस्करीसारखे गुन्हे रोखणे व त्याविरूध्द लढणे आणि त्याबरोबरच राज्याचा विकासावर तस्करीमुळे होणारा परिणाम या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होईल. 28 जुलै रोजी मानवी तस्करी विरूध्द लढणे आणि त्याला नष्ट करण्यासाठी घेण्यात आलेल्या पुढाकार यावर चर्चासत्र होईल. यातील पहिले चर्चासत्र मानवी तस्करीला प्रतिबंध करणारे कायदे आणि न्यायव्यवस्था उभी करण्याबाबत असेल. दुसरे चर्चासत्र मानवी तस्करीतून बचावलेल्या व्यक्ती शासकीय प्रतिनिधी आणि या चळवळीत सहभागी होणार्‍यांचे प्रतिनिधी यांच्या भाषणांचा समावेश असेल. हे सर्वजण मानवी तस्करीला बळी पडलेल्यांना पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देण्याबाबतीत आणि समाजात स्थान मिळवून देण्याबाबतीत आपले  विचार व्यक्त करतील. या तीनही चर्चासत्रात मिळून मानवी तस्करी संबंधातील गुन्हेगारी, सायबर ट्रॅफिकिंग आणि तस्करी विरोधात माध्यमांची भूमिका याबाबतीत प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यांतील अखेरचे सत्र महिलांच्या तस्करीला कशाप्रकारे प्रतिबंध करता येईल यावरील चर्चेने होणार आहे.

गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा, रस्ते वाहतुक व महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, रविशंकर प्रसाद, व राज्यस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचा समारोप होणार असल्याचे रहातकर यांनी सांगितले. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक, तेलंगणाचे पोलिस आयुक्त महेश भागवत आणि महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक सतिश माथूर, मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि,गोव्याचे डायरेक्टर जनरल मुक्तेश चंदेर,आयटीपीएचे माजी दंडाधिकारी स्वाती चौहान हे या परिषदेत संवाद साधणार आहेत. तसेच, चर्चासत्रात आयजेएमचे मुख्य अधिकारी गॅरी हॉगेन, घानाच्या समिरा बाऊमिया, फिलिपिन्स पोलिस दलाच्या लिबोरिओ कॅराबॅक्कन, केनिया पोलिस दलाच्या बाल संरक्षण विभागाच्या अधिक्षक ग्रेस एनजोकीएन्डीरांगो, बोलिव्हीयाच्या पोलिस दलाचे कर्नल जॉनी अ‍ॅग्वीलेरा, कंबोडियाच्या आंतरराष्ट्रीय मायग्रेशन विभागाचे मेंगलांगकेंग, ब्राझीलचे लोकप्रतिनिधी डेपुटाडो कार्लोस बेझेरा, फिलिपिन्सच्या मानवी तस्करी विरोधी विभागाच्या प्रमुख जेनेट फ्रांसिस्को,थायलंडचे अँटी ट्रॅफिकिंग इन पर्सन्स डिव्हिजनकडून लेफ्टनंट कर्नल अरूण प्राँफन,रिस्पॉन्सिबल फॉर सोर्सिंग ऑपरेशन्स वॉलमार्टचे सुनिल जेकब, प्रज्वलाच्या डॉ.सुनिता कृष्णन या वक्तयांचा सहभाग राहणार आहे. राज्य महिला परिषदेच्या अध्यक्षा विजया रहातकर हे केंद्रीय व राज्य सरकार यांचे प्रतिनिधित्व करतील हे विशेष.

Related Post