एफटीआयआयच्या सिनेमॅटोग्राफी, अभिनय व स्क्रीनप्ले राइटिंग या फाऊंडेशन कोर्सना मुंबईत सुरुवात

विशेष प्रतिनिधी 2017-08-18 10:55:10.0
img

मुंबई : माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि फिल्म्स डिविजन या दोन माध्यम एककांनी मुंबईत संयुक्त विद्यमाने लघू अभ्यासक्रम सुरु केले आहेत. डिजिटल सिनेमॅटोग्राफी, स्क्रीनप्ले राइटिंग आणि अभिनय यातील तीन आठवडे कालावधीचे फाऊंडेशन कोर्स आज फिल्म्स डिविजनच्या परिसरात सुरु झाले.

एफटीआयआय पुणेचे संचालक भूपेंद्र कॅन्थोला आणि फिल्म्स डिविजनच्या संचालक स्वाती पांडे यांनी या अभ्यासक्रमांचे उद्‌घाटन केले. यावेळी तिन्ही अभ्यासक्रमांचे संचालक ए.एस.कनाल (डिजिटल सिनेमॅटोग्राफी), विकास शर्मा (स्क्रीनप्ले राइटिंग) आणि चंदर मोहन खन्ना (अभिनय) उपस्थित होते. स्किफ्ट (स्किलिंग इंडिया इन फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन) अभ्यासक्रमांना देशभरातून प्रतिसाद लाभला असून, यातून शिकण्याची क्षुधा किती मोठी आहे ते दिसून येते आहे, असे भूपेंद्र कॅन्थोला यांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात सांगितले. चित्रपट आणि दूरचित्रवाणी शिक्षणात राष्ट्रीय स्तरावर अग्रेसर संस्था म्हणून एफटीआयआयचा नावलौकिक असल्याचे ते म्हणाले. दिल्लीत अनेक लघू अभ्यासक्रम राबवल्यानंतर मुंबईतही असे अभ्यासक्रम राबवण्याची मागणी होत होती, असे कॅन्थोला यांनी यावेळी सांगितले. देशात माहितीपट चळवळीला प्रोत्साहन देण्यात फिल्म्स डिविजनचा मोठा वाटा असून, याबाबत दांडगा अनुभव असल्याचे स्वाती पांडे यांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात सांगितले. एफटीआयआयच्या सहकार्याने गुणवत्तापूर्ण आणि रास्त शुल्काचे लघू अभ्यासक्रम राबवणे शक्य होत असून, अशा आणखी काही अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाईल, असे पांडे यांनी सांगितले.

अभ्यासक्रमांसाठी 67 विद्यार्थी असून, त्यात 11 महिला आहेत, सर्वात ज्येष्ठ विद्यार्थी 73 वर्षांचे असून, सर्वात तरुण 18 वर्षांचे आहेत. राज्यातल्या मुंबई, ठाणे, अकोला, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे इथले विद्यार्थी अभ्यासक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. याखेरीज कर्नाटक (बंगळुरु, मणिपाल), अरुणाचल प्रदेश (चॅगलांग), उत्तराखंड (देहराडून, रुद्रपूर) बिहार (पाटणा, गया), जम्मू-कश्मीर (जम्मू), पंजाब (मोहाली, लुधियाना, परियाला), उत्तर प्रदेश (प्रतापगढ) आणि मध्य प्रदेश इथूनही विद्यार्थी आले आहेत. डिजिटल इमेजिंग क्षेत्रात जागतिक स्तरावरील आघाडीची कॅनॉन कंपनी स्किफ्टची तंत्रज्ञानातील भागीदार आहे. तांत्रिक सहकार्यासाठी मुंबईस्थित यासुका आणि स्टुडिओ असिस्ट हे इतर भागीदार आहेत. त्यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. देशभरात लघू कालावधीचे अभ्यासक्रम राबवून चित्रपट शिक्षणाचा प्रसार करणे हे एफटीआयआयच्या स्किफ्ट उपक्रमाचे एक उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या विशेष प्रकल्पांतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून एफटीआयआयला कौशल्याभिमुख लघू अभ्यासक्रम राबवण्यासाठी अलीकडेच मान्यता मिळाली आहे.

Related Post