ऑलिम्पिकमध्ये रशियावर सरसकट बंदी नाही

2016-09-22 11:21:01.0
img

सरकार पुरस्कृत उत्तेजक सेवनप्रकरणी रशियाच्या चमूवर रिओ ऑलिम्पिकमध्ये सरसकट बंदी न घालण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला. रिओ ऑलिम्पिकमध्ये रशियाच्या खेळाडूंना सहभागी होऊ देण्याचा निर्णय समितीने प्रत्येक खेळाच्या संघटनेवर सोपवला आहे. रिओमध्ये सहभागासाठी इच्छुक रशियाच्या क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या उत्तेजकांसंदर्भातील सक्त निकषांचे पालन करावे लागेल. ५ ऑगस्टपासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे.

दरम्यान उत्तेजक सेवनप्रकरणी याआधी दोषी आढळलेल्या आणि शिक्षा झालेल्या रशियाच्या क्रीडापटूंना रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. रशियाच्या ट्रॅक अँड फिल्ड अर्थात मैदानी खेळात सहभागी होणाऱ्या क्रीडापटूंवर बंदी घालण्यात आली आहे. रशिया उत्तेजकप्रकरणी जागल्याची भूमिका निभावणाऱ्या धावपटू युलिया स्टेपानेव्हाला रिओ ऑलिम्पिकमध्ये तटस्थ खेळाडू म्हणून सहभागी होता येणार नाही असा निर्वाळा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या आचारसंहिता आयोगाने दिला आहे. ?ऑलिम्पिकमध्ये रशियाच्या खेळाडूंना सहभागी व्हायचे असेल तर त्यांना कठोर नियमावलीचे पालन करावे लागेल. ऑलिम्पिकमध्ये रशियाच्या पथकावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय अवघड होता. त्याने निर्दोष खेळाडूंवर अन्याय झाला असता. क्रीडा संघटनांना निर्णय सोपवत याप्रकरणी संतुलन साधण्याचा आमचा प्रयत्न आहे?, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी सांगितले.

उत्तेजकसेवनप्रकरणी ऑलिम्पिकमध्ये रशियावर सरसकट बंदी घालावी यासाठी जागतिक स्तरातून आयओसीवर दबाब वाढला होता. रविवारी झालेल्या तीन तासांच्या वादळी बैठकीनंतर वैयक्तिक क्रीडा संघटनांकडे सोपवण्याचा सुरक्षित निर्णय आयओसीने घेतला. हा निर्णय वस्तुनिष्ठ आहे अशी प्रतिक्रिया रशियाच्या क्रीडा मंत्र्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे आयओसीने नेतृत्त्वाची जबाबदारी घेत ठोस निर्णय घेण्याचे टाळले आहे अशा शब्दांत अमेरिकेने आपली नाराजी व्यक्त केली. रशियाच्या क्रीडापटूंचा सहभाग असलेल्या २८ क्रीडा संघटनांना निर्णय घेण्यासाठी केवळ १२ दिवस आहेत. संघटनेला रशियाच्या प्रत्येक खेळाडूचे विश्लेषण करावे लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित उत्तेजक चाचण्यांचे निर्णय प्रमाण मानता येतील. मॅकलरेन यांच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलेले खेळाडू आणि राष्ट्रीय संघटना यांना ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. कॅनडाचे विधितज्ञ रिचर्ड मॅकलरेन यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने रशियाच्या क्रीडापटूंचा उतेजक सेवनासंदर्भातला अहवाल समितीला सादर केला. २०११ उत्तरार्धापासून या गैरप्रकाराला सुरुवात झाली आणि २०१४ मध्ये रशियातील सोची येथे झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकदरम्यान प्रकरणाने परिसीमा गाठली असे मॅकलरेन यांनी स्पष्टपणे सांगितले.

Related Post