विश्वचषक संघात महाराष्ट्राचा एकही कबड्डीपटू नाही

2016-09-22 11:24:49.0
img

मुंबई- पुढील महिन्यात अहमदाबादमध्ये होणा-या चौथ्या कबड्डी विश्वचषक संघाची घोषणा मंगळवारी मुंबईत झाली. प्रसिद्ध चढाईपटू अनुप कुमारच्या नेतृत्वाखालील १४ सदस्यीय संघात महाराष्ट्राच्या एकाही कबड्डीपटूचा समावेश नाही. या संघातील निम्मे म्हणजे सात कबड्डीपटू हरयाणाचे आहेत.

प्रो-कबड्डी लीगची कामगिरी विचारात घेत निवडण्यात आलेल्या भारताच्या संघात हरयाणाने वर्चस्व राखले आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरातचे प्रत्येकी दोन तसेच तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि पंजाबचा प्रत्येकी एक कबड्डीपटू आहे. विद्यमान संघातील सर्व कबड्डीपटू फॉर्मात असले तरी काशिलिंग आडके, रिशांक देवाडिगा, नीलेश साळुंके, सचिन शिंगाडे, विशाल माने, नीलेश शिंदे यांचा विचार झाला नाही. ७ ऑक्टोबरपासून रंगणा-या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारताच्या संघाची घोषणा महान क्रिकेटपटू कपिल देव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यावेळी आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनचे (आयकेएफ) अध्यक्ष जनार्दन गेहलोत, भारतीय हौशी कबड्डी फेडरेशनच्या (एकेएफआय) मृदुल भदौरिया यांची उपस्थिती होती. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून बलवान सिंग यांची निवड करण्यात आली आहे. ई. भास्करन त्यांचे सहकारी असतील.

भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून अष्टपैलू मनजीत चिल्लरची निवड झाली आहे. अनुप आणि मनजीतसह अजय ठाकूर, दीपक हुडा, जसवीर सिंग, परदीप नरवाल, राहुल चौधरी, (चढाईपटू), मोहित चिल्लर, धरमराज चेरालाथन, सुरेंदर नाडा, सुरजीत (बचावपटू), संदीप नरवाल, नितीन तोमर, किरण परमार (अष्टपैलू) यांचा संघात समावेश आहे. विद्यमान संघात अनुपसह पाच चढाईपटू (रेडर) आहेत. चार बचावपटू (डिफेंडर) असून मनजीत, संदीप, नितीन आणि किरण असे पाच अष्टपैलू आहेत. कबड्डी वर्ल्डकप संघात १२ संघ खेळतील. त्यात यजमान भारतासह इराण, दक्षिण कोरिया, बांगलादेश, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पोलंड, थायलंड, जपान, अर्जेटिना, केनया संघांचा समावेश आहे.

Related Post