Wed Apr 09 00:23:19 IST 2025
मुंबई- भारताच्या राष्ट्रीय निवडसमितीच्या अध्यक्षपदी माजी यष्टिरक्षक, फलंदाज एमएसके प्रसाद यांची निवड झाली आहे. त्यांना केवळ सहा कसोटी आणि १७ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. गगन खोडा (मध्य विभाग), देवांग गांधी (पूर्व विभाग), जतीन परांजपे (पश्चिम विभाग) आणि शरणदीप सिंगचा (उत्तर विभाग) पाच सदस्यीय समितीत समावेश आहे.
४१ वर्षीय प्रसाद यांची माजी सिलेक्टर संदीप पाटील यांच्या जागी निवड झाली आहे. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मागील निवडसमितीत त्यांचा दक्षिण विभागाचे प्रतिनिधी म्हणून समावेश होता. भारताची आजवरची अननुभवी निवडसमिती म्हणून विद्यमान पॅनेलची गणना करता येईल. मुख्य सिलेक्टर प्रसादप्रमाणे अन्य सदस्यांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारच कमी अनुभव आहे.
प्रसाद यांच्यानंतर देवांग गांधी आणि शरणदीपने कसोटी सामने खेळलेत. राजस्थानचा माजी सलामीवीर असलेला खोडा आणि मुंबईचा माजी मधल्या फळीतील फलंदाज जतीन परांजपेच्या वाटय़ालाही कसोटी क्रिकेट आले नाही. खोडाला केवळ दोन आणि जतीनला केवळ ४ वनडे खेळता आल्यात. पाचही सिलेक्टर्सचा अनुभव १३ कसोटी आणि ३१ वनडे सामने इतका आहे.