Fri Jul 04 07:00:03 IST 2025
मुंबई : टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेचं कांस्यपदक जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
पी. व्ही. सिंधुने देशासाठी दुसरं ऑलिंपिक पदक जिंकून देशाचा गौरव वाढवला आहे. तिने जिंकलेल्या ऑलिंपिक कांस्यपदकाचा आनंद देशवासियांसाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे कौतुक केले आहे. पी. व्ही. सिंधुकडून देशाला ऑलिंपिक सुवर्णपदकाची अपेक्षा होती. संपूर्ण स्पर्धेत तिने कामगिरीही दमदार केली. सुवर्णपदक जिंकून देण्याच्या प्रयत्नात ती कुठेही कमी पडली नाही. तिच्या कामगिरीचा देशवासियांना अभिमान आहे. पी. व्ही. सिंधुने कांस्यपदक जिंकले असले तरी तिच्या खेळ आणि
पदकामुळे देशवासियांना मिळालेला आनंद सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. यापुढच्या काळातही पी. व्ही. सिंधुकडून अशीच जागतिक दर्जाची सर्वोत्कृष्ट कामगिरी घडेल. तिच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक उदयोन्मुख युवक खेळांकडे वळतील. जागतिक दर्जाची कामागिरी करुन पदक जिंकतील. देशाचा गौरव वाढवतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.