खेळाडूंना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील - सुनील केदार, वेळाहरी बेसा येथे ॲचिव्हर्स बॅडमिंटन क्लबचे उद्घाटन

jitendra.dhabarde@gmail.com 2021-10-10 20:43:41.0
img

नागपूर : खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. नागपुरात येत्या जानेवारीत आंतरराष्ट्रीय युथ फेस्टिव्हल नियोजित आहे. तसेच सध्या कोरोना संसर्ग कमी होत असून क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

वेळाहरी बेसा येथे श्री स्वामी समर्थ स्पोर्टस् अँड वेलफेअर असोसिएशनच्या ॲचिव्हर्स बॅडमिंटन क्लबचे उद्घाटन आज श्री. केदार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा परिषद सदस्य मेघा मानकर, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव मंगेश काशीकर, दिनकर कडू, संजय कांडगावकर, बेसाचे सरपंच सुरेंद्र बानाईत, वेळाहरीचे सरपंच सचिन इंगोले, क्लबचे अध्यक्ष अजय दोनोडे, उपाध्यक्ष संजय चरडे उपस्थित होते. खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास होवून व्यक्तिमत्व घडते. सांघिक भावना निर्माण होते. त्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आजही अनेक क्रीडा प्रकारातील प्रशिक्षक, विविध तज्ज्ञ परदेशातून बोलवावे लागतात.

या क्षेत्रात करिअरच्या संधी असून युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील अभियंते करिअरसाठी जगभरात पोहचले, त्याप्रमाणेच या विद्यापीठात घडलेले प्रशिक्षक, तज्ज्ञ भविष्यात देशात, परदेशात जावून करिअर करतील, असा विश्वास श्री. केदार यांनी यावेळी व्यक्त केला. ॲचिव्हर्स बॅडमिंटन क्लबमुळे ग्रामीण भागात चांगले खेळाडू घडण्यास मदत होईल, असेही ते यावेळी म्हणाले. खासदार श्री. तुमाने, श्री. काशीकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

Related Post