Fri Nov 22 04:00:23 IST 2024
नागपूर : अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक दूध देणाऱ्या गायी तयार होऊन विदर्भात दूग्धक्रांती घडून यावी, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त करीत मदर डेअरीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा सज्जड दमही त्यांनी दिला.
अॅग्रोव्हिजन अंतर्गत विदर्भातील दूग्ध व्यवसायाच्या संधी विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद््घाटन सत्रात ते बोलत होते. शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या सोहळ्याला पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष मिनेश शाह, मदर डेअरीचे समन्वयक रविंद्र ठाकरे, मनिष बंदीश, संशोधक डॉ. शाम झवर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, सभापती तापेश्वर वैद्य अॅग्रोव्हिजन आयोजन समितीचे सचिव रवी बोरटकर, सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी प्रामुख्याने उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले की, गत ३-४ वर्षांपासून कार्यरत असूही मदर डेअरीली विदर्भात अपेक्षेनुसार काम करता येऊ शकले नाही. दररोज ३ लाख लिटर दूध संकलनाची अपेक्षा अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. केंद्राकडून अनेक प्रकारची मदत करूनही पुढे जाता आले नाही. राज्य सरकारने दिलेला निधीही खर्च करता आला नाही. संकलन केंद्र कुलींग सेंटरची उभारणीही पूर्ण करता आली नाही. याची अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घ्यावी, अन्यथा पुढील दोन महिन्यांमध्ये संबंधितांवर कारवाईसाठी आपणच पूर्ण ताकत लावू, असा इशारा त्यांनी दिला. विदर्भातच टेस्ट ट्यूबच्या मदतीने कमी दूध देणाऱ्या गायींपासून २० ते २५ लिटर दूध देणाऱ्या गायी तयार करण्यात यश आले आहे. प्रत्येक गावात अशा गायी तायर होऊन विदर्भातील दूग्ध उत्पादन वाढावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुनील केदार यांनी दुधावर प्रक्रिया आणि दूग्ध उत्पादनांच्या मार्केंटींगवर भर देण्याची गरज प्रतिपादित केली. दूध उत्पादन केवळ गाव किंवा शहरापुरता मर्यादित नाही तर तो आज जागतिक विषय ठरला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याची क्षमता या व्यवसायात आहे. अधिकाधिक उपयोग वाढेल अशा दूग्ध उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. मागणी वाढली तरच दूधाचे अधिक दर शेतकऱ्यांना मिळू शकतील. दुधाचे अर्थकारण आणि त्यातील समृद्धीती शेतकऱ्यांना जाणीव करून द्यावी लागेल, ते केल्यास शेतकरी स्वत:च या व्यवसायाची कास धरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मिनेश शाह यांनी विदर्भ, मराठवाड्यातील दूध उत्पादन वाढविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. लवकरच याच भागातून दररोज ५ लाख लिटर दूध संकलन करणार असून त्यासाठी उपाययोजना सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. शाम झवर, "अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने दर्जेदार गायींपासून तब्बल ३०० वासरं तयार केली जाऊ शकतात. त्यासाठी कमी दूध देणाऱ्या गायींचा गर्भ वापरला जातो. या पद्धतीने अधिक उत्पादन देणाऱ्या गायी मिळतील. डॉ. अतूल ढोक, " फारच कमी उत्पादन असणाऱ्या विदर्भात दूध उत्पादनाच्या दृष्टीने मोठी संधी आहे. क्लस्टर तयार करून शेतकऱ्यांनी दर्जेदार पदार्थ बाजारात दिल्यास त्यांचे उत्पन्न निश्चितच दुप्पट होण्यास मदत होईल. जनावरांना सकस, गुणवत्तापूर्ण आहार हाच यशस्वी दूग्धव्यवसायाचा मूलमंत्र आहे. शेतकरी मात्र त्याकडेच दुर्लक्ष करतात. योग्यपद्धतीचा चारा दिल्यास खर्च कमी आणि उत्पन्न अधिक असा दुहेरी लाभ साधता योतो." डॉ. सारीपूत लांडगे, "अलिकडच्या काळात सेंद्रिय दूध ही संकल्पना वाढीस लागली आहे. या दुधाला शंभर ते सव्वाचे रुपयांचा भाव सहज मिळतो. पुढील पाच वर्षात सेंद्रिय दुधाच्या मागणीत ३०.२० टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आताच तयार होणे आवश्यक आहे."