Fri Apr 04 07:06:34 IST 2025
नागपूर : आयुर्वेदात महत्वपूर्ण मानल्या जाणार्या आणि आरोग्य रक्षणासाठी देशाच्या विविध भागात निरनिराळ्या हवामानात अनेक औषधी वनस्पतींचे उत्पादन होते, पण त्यासंदर्भात माहिती नसल्याने हा नैसर्गिक साठा वाया जातो, सध्या आयुर्वेदाला राजाश्रय मिळत असल्याने येत्या काळात देशभरात औषधी वनस्पती लागवडीला भरपूर वाव असल्याचे मत मानस आयुर्वेद आणि आयुर्वन फाऊंडेशनचे संचालक अंबरीश घटाटे यांनी व्यक्त केले.
नागपुरातील रेशीमबाग येथे सुरू असलेल्या अॅग्रो व्हिजन प्रदर्शनात आयोजित कार्यशाळांमध्ये शनिवारी दुपारी वनौषधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान या विषयावरील चर्चासत्रात अंबरीश घटाटे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. निसर्गात हिरडा, बेहडा, शतावरी, गुग्गुळ आदी 400 प्रकारच्या वनौषधी तयार होतात. आजवर त्या निसर्गत: तयार होत असत पण आता त्याची मागणी वाढल्याने निसर्गाच्या खजिन्याचे केवळ शोषण सुरू आहे, त्यामुळे बहुतांश वनस्पती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या वनस्पती अतिशय मौल्यवान आहेत, त्याचे मुल्य अनेकांना माहिती नाही, त्यासाठी यासंदर्भात प्रशिक्षण व लागवडीच्या पद्धतीविषयी माहिती देण्यासाठी आयुर्वन कार्यरत आहे. चीन सारख्या देशात वनौषधींची फार लागवड होत नाही पण त्यांची निर्यात सर्वाधिक आहे आणि भारतात याची निर्मिती होत असूनही अज्ञानामुळे शेतात कचरा म्हणून त्या वाया जातात. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकर्यांनी जागरुक होऊन अधिक काळजीपुर्वक हे काम केल्यास अधिक उत्पन्न देखील होईल आणि देशाला देखील त्याचा लाभ होईल असे मत घटाटे यांनी व्यक्त केले. शेतकर्यांच्या शेतातील कचर्यात या वनस्पतींची मुळे, पाने, फुले, फळे, बिया पडून असतात. पण माहिती नसल्याने कचरा म्हणून त्याची विल्हेवाट लावली जाते.
या वनस्पतींना जागतिक बाजारपेठेत भरपूर मागणी आहे, त्याची किंमत अधिक आहे, नियमित पिकांसोबत त्याची लागवड करता येते यासंदर्भातील जागृतीसाठी हे चर्चासत्र असल्याचे घटाटे यांनी सांगितले. या चर्चासत्रात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेवटी प्रश्नोत्तर सत्राच्या माध्यमातून शंकासमाधान करण्यात आले.