Fri Nov 22 04:15:30 IST 2024
नागपूर : कमी जागेत आणि कमी गुंतवणुकीत अधिकाधिक उत्पादन मिळवून देणारे व्हर्टीकल फार्मिंग हे शेतीला उद्योजकतेचा दर्जा मिळवून देणारे नवे तंत्र आहे, असे मत व्हर्टिकल फार्मिंगचे तज्ज्ञ व शेती उद्योजक डॉ. साईनाथ हाडोले यांनी व्यक्त केले.
रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या अॅग्रोव्हीजन कृषी प्रदर्शनीच्या आज दुस-या दिवशी दुपारच्या सत्रात हॉल क्र. 2 मध्ये 'व्हर्टिकल फार्मिंग' विषयावर डॉ. साईनाथ हाडोले यांचे व्याख्यान झाले. डॉ. होडोले म्हणाले, "नापिकी, कर्जबाजारी अशा अनेक कारणांमुळे मधल्या काळात विदर्भात शेतक-यांचा आत्महत्या झाल्या. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी व्हर्टीकल फार्मिंगचे तंत्र लाभदायी ठरू शकते. उच्च तंत्रज्ञानाधिष्ठीत मातीवर आधारित व्हर्टीकल शेतीच्या क्षेत्रातील अग्रणी ए एस अॅग्री अँड अॅक्वा एलएलपी ही कंपनी शेतक-यांना त्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यास, खर्च कमी करण्यास आणि त्यांच्या शेतीच्या कार्याचा सर्वाधिक फायदा करून सहाय्य करते."
पारंपरिक शेतीमध्ये पीकांची पारंपरिक पद्धतीने वाढ करताना पूरक हवामानावर अवलंबून राहावे लागते आणि त्याला बेभवरशाचा पाऊस, वादळ, पूर, वन्यप्राणी, दुष्काळ, तण आणि किटक यांचे आघात सहन करावे लागतात. पण पॉलिहाऊसमध्ये करण्यात येणा-या उच्च तंत्रज्ञानावर आधारित या व्हर्टिकल फार्मिंगमुळे वर्षभर आणि सर्व हंगामात पीक घेता येते. त्यामुळे संपूर्ण वर्षभर पिकाची उत्पादकता वाढते. शेतक-यांनी हे नवे तंत्र शिकून, समजून घ्यावे व शेती उद्योगात उतरावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी यावेळी शेतक-यांच्या समस्यांचे समाधान केले. डॉ. शैलेश गावंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.