Fri Nov 22 03:53:55 IST 2024
नागपूर : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दिशेने मस्त्यशेतीचा विकास महत्त्वाचे पाऊल आहे. मत्स्यशेतीत शेतकऱ्यांच्या समृद्धीची बिजे असल्याचा विश्वास अरुणाचल प्रदेशचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री टागी टाकी यांनी व्यक्त केला.
अॅग्रोव्हिजनच्या तिसऱ्या दिवशी रविवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात विदर्भातील गोड्यापाण्यातील मत्स्यव्यवसाय विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद् घाटन सत्रात ते बोलत होते. राजस्थानचे कृषीमंत्री लालचंद कटारिया, राजस्थानचे पशुसंपदा मंत्री मुरालीलाल मिणा, आमदार क्रिष्णाराम बिष्णोई, राष्ट्रीय मत्स्त्य विकास मंडळाच्या सुवर्णा चंद्रपागारी, माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, अॅग्रोव्हिजनचे संयोजक डॉ. गिरीश गांधी, सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, आयोजन सचिव रवी बोरटकर प्रामुख्याने उपस्थित होते. टागी टाकी यांनी निसर्गाला धोका निर्माण न करता मत्स्य उत्पादन वाढावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. निसर्गाकडे दुर्लक्ष झाल्यास नामशेष होत असलेल्या माशांच्या प्रजाती कायमच्या नष्ट होण्याचा धोका असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता पशुपालन, मत्स्यशेतीकडेही लक्ष देण्याचा सल्ला दिला. लालचंद कटारिया यांनी राजस्थानातील मोठा भाग जलसंकटाचा सामना करीत असला तरी स्थानिक शेतकरी शेतीसोबत पशु व मत्स्य पालनात रस घेत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. जगात उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने मत्स्यपालनातील नफा पर्यायाने शेतकऱ्यांची समृद्धी साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुवर्णा चंद्रपागारी यांनी विदर्भात अनेक नद्या, नाले, तलाव, जलसाठे उपलब्ध असल्याने मत्स्यशेतीच्या विकासाला मोठा वाव असल्याचे सांगितले. मत्स्य संगोपन करताना उत्पादन व उत्पादकता दोन्ही वाढवावे लागेल. शासन स्तरावरून विविध योजनांच्या माध्यमातून मत्स्यपालनाला चालना दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून निलक्रांती साधन्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनीही पुढे येऊन त्याचा लाभ घेण्याची गरज आहे. बायोक्लॉक तंत्रज्ञान, पाणीपुनर्वापर मत्स्यप्रणाली, तरंगणाऱ्या पिंजऱ्यात मत्त्य शेतीद्वारे मात्स्यशेतीतून उत्पन्न वाढविणे शक्य आहे, असे समिर परवेज म्हणाले. शेतकऱ्यांनी उपलब्ध संसाधनांचा उपयोग करणे अपेक्षित आहे. पण, शेततळ्यात मत्स्यपालनाबाबत अनेक गैरसमज आहेत. वास्तविक शेततळ्यातूनही मोठ्या प्रमाणावर माशांचे उत्पन्न घेता येते. शास्त्रीय पद्धतीने मत्स्यसंगोपन करून शेतकऱ्यांनी समृद्धी साधावी, असे सत्यजित बेलसरे म्हणाले.