Fri Apr 04 07:05:48 IST 2025
नागपूर : प्राणी, मनुष्यबळाची कमतरता दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे वेळेत रोवणी, फवारणी, डवरणी, वेचणी सारख्या शेतीच्या कामांमध्ये वेळ, पैसा, श्रम खर्च होतात. पण त्याच पैशात ट्रॅक्टरसारखे यंत्र वापरले तर सर्व कामे वेळेवर होती व शेतीची उत्पादकता वाढेल, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक म्हस्के यांनी केले.
अॅग्रोव्हीजन कृषी प्रदर्शनीच्या तिस-या दिवशी हॉल क्रमांक 1 मध्ये 'लहान शेतीसाठी यांत्रिकीकरण संधी' विषयावर प्रा. डॉ. अशोक म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. ट्रॅक्टर सोबत उच्च दर्जाचे आधुनिक पीक डवरणी यंत्र, आंतर मशागत यंत्र, कार्यक्षम फवारणी करणारे यंत्र, मळणी यंत्र, कचरा व्यवस्थापन यंत्रांचा आता आधार घेणे आवश्यक आहे. यामुळे वेळेवर काम होईल व उत्पादकता वाढेल, मजुरीत बचत होईल, बियाणे-खतांमध्ये बचत होईल, पिकांची घनता वाढेल. भविष्यात शेतीचे यांत्रिकीकरण करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही. त्यामुळे आताच शेतक-यांनी आपली मानसिकता बदलून शेतीमध्ये यंत्र वापरण्यास सुरुवात करावी, असे ते म्हणाले.
आताच्या पिढीला शेतीत काम करायची लाज वाटते. शेतीत काम करणा-यांचा सामाजिक स्तर खालचा समजला जातो. पण शेतात अशी यंत्रे वापरली गेली तर मुलेही स्वत:ला इंजिनीयर समजली, त्यांना लाज वाटणार नाही व शेतक-याचा सामाजिक स्तर उंचावेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतक-यांच्या शंकांचे निरसन केले. डॉ. म्हस्के यांचे स्वागत सीसीआयआरचे शास्त्रज्ञ डॉ. नरेश मेश्राम यांनी केले.