संत्र्याच्या निर्यातीला मोठी संधी : डॉ. दिनेश कुमार, अॅग्रो व्हिजन

jitendra.dhabarde@gmail.com 2021-12-27 20:25:46.0
img

नागपूर : सद्यस्थितीत आपल्याकडील संत्रा बांग्लादेश व नेपाळला निर्यात केला जात आहे. आवश्यक खबरदारी घेतल्यास संत्र्याच्या निर्यातीची मोठी संधी आपल्याकडे उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे डॉ. दिनेश कुमार यांनी दिली.

अॅग्रोव्हिजन अंतर्गत रविवारी केळी आणि संत्र्याचे निर्यातक्षम उत्पादन विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे असोसीएट डीन डॉ. डी. एम. पंचभाई, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे प्रधान वैज्ञानिक डॉ. अंबादास हुच्चे, डॉ. आशुतोष मुरकुटे, कीट संशोधक नरेश मेश्राम, डॉ. तिरू यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. डॉ. दिनेश कुमार यांनी योग्यरित्या हाताळणी होत नसल्यानेच हाती आलेल्या फळांचाही दर्जा खालावत असल्याकडे लक्ष वेधले. प्रिकुलींग, वाशिंग, यंत्राद्वारे संत्र्याचे ग्रेडिंग, सेपरेशन, वॅक्स कोटींग, टेलीस्कोपिक बॉक्समध्ये पॅकिंग केल्यास संत्र्याचा दर्जा कायम राहून अधिक दर मिळणे शक्य होते. यामुळे मानवी हस्तक्षेपापेक्षा अधिकाधिक यंत्राचा उपयोग करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

डॉ. अंबादास हुच्चे यांनी विदर्भातील जमिनीचा पोत व येथील वातावरणामुळे कोणत्याही लिंबूवर्गीय पिकाचे हेक्टरी २५ ते ३० टन पीक घेणे सहज शक्य आहे. त्यासाठी केवळ योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. डी. एम. पंचभाई यांनी उत्तम व्यवस्थापन, योग्य कलमांचा वापर, किड नियंत्रण, पोषक मुलद्रव्यांद्वारे २५ ते ३० टनापर्यंत दर्जेदार संत्र्याचे उत्पादन सहज शक्य असल्याचे सांगितले. डॉ आशुतोष मुरकुटे यांनी निकोप व उपयुक्त रोप व कलमांची निवड करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. नरेश मेश्राम यांनी किट रोगांच्या नियंत्रणावर प्रकाश टाकला, तर डॉ. तिरू यांनी केळीच्या दर्जेवार वाणांबाबत माहिती दिली.

Related Post