Fri Apr 04 06:49:44 IST 2025
दिल्ली : गर्दीचा फायदा घेत काही नराधमांनी इमरान खान यांच्या ताफ्यावर गोळीबार केला. विशेष म्हणजे हल्लोखोरांच्या AK -47 रायफलच्या निशाण्यावर इमरान खान यांच्यासह पाकिस्तानातील अनेक दिग्गज नेते होते. त्यांनी इमरान यांच्या हत्येचा कट आखला होता, असा आरोप पीटीआय पक्षाकडून करण्यात आलाय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आतापर्यंत एकाचा मृत्यू झालाय. तर चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात इमरान खान यांच्या डाव्या पायाला गोळी लागलीय. रॅलीत अचानक चार ते पाच नराधम आले आणि त्यांनी इमरान खान यांच्या ताफ्यावर गोळीबार सुरु केला. या गोळीबारात इमरान यांच्या पक्षाचे काही दिग्गज नेते देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
संबंधित घटना ही वजीराबाद येथे घडली. रॅलीत अचानक गोळीबार सुरु झाल्यानंतर परिसरात मोठा गदारोळ झाला. रॅलीत सहभागी झालेले नागरीक सुरक्षितस्थळी जाण्याचा प्रयत्न करु लागले. यावेळी हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि लगेच पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात हल्लेखोर यशस्वीदेखील झाले. पण त्यांच्यापैकी एक हल्लेखोर पकडला गेला. पोलिसांनी त्याला अटक केलीय. दुसरीकडे जखमी इमरान खान यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लाहौरला पाठवण्यात आलं.