प्रधानमंत्री पीक विमा योजनेला ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

jitendra.dhabarde@gmail.com 2023-07-31 23:00:33.0
img

नागपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम तारीख खरीप हंगाम २०२३ करिता ३१ जुलै पर्यंत होती. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार कप अँड कॅप मॉडेलनुसार ही योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ या हंगामासाठी तीन वर्षांकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून ३ वर्षांसाठी निवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये काही हजारात पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची गेल्यावर्षीपर्यंत संख्या होती. मात्र यावर्षी २ लाखापर्यंत शेतकरी या योजनेचा एकट्या नागपूर जिल्ह्यात लाभ घेत आहे. केवळ एका रुपयात पीक विमा दिला जात आहे. हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या बाबींचा समावेश आहे.

७/१२ उतारा, ८ अ, आधार कार्ड, बँक पासबुक (खाते क्रमांक) या कागदपत्राची आवश्यकता आहे. सर्वसमावेशक पिक विमा योजनेमध्ये सहभागी होणेसाठी शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.

Related Post