Fri Apr 04 06:46:01 IST 2025
बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा,देऊळगाव राजा, लोणार तालुक्यात रात्रीपासून अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.या नुकसानाची माहिती मिळताच खासदार प्रतापराव जाधव यांनी पहाटेच शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेत नुकसानीची पाहणी केली. अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
आज सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का,माळ सावरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नेट शेड, भाजीपाला, तुर, गहू, हरभरा पिकांच्या शेतात पाणी साचलेले आहे तर कुठे गारांचा थर असल्याचे थर असल्याचे जाधव यांनी सांगितले. पळसखेड चक्का हे गारपीट होण्याचं केंद्र बनलं आहे. शेतकऱ्यांनी जवळपास १५ किलोंची गार हात धरली आहे, असं आपण पाहतोय. या ठिकाणी असलेले शेतकरी शेडनेटच्या माध्यमातून बीजोत्पादन करत असतात. गारपीट झाल्यानं आणि वाऱ्यामुळं त्याचं नुकसान झालं आहे. गारपीट झाल्यानं टॉमेटोचं नुकसान झालंय. कापसाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची जी पिकं शेतात होती त्यांचं जवळपास १०० टक्के नुकसान झालं, आहे, असं प्रतापराव जाधव म्हणाले आहेत.
प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांना तातडीने आजच्या आज पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी संबधित अधिकाऱ्यांना जाधव यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर बोलवून घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी निर्दोष पंचनामे करा. त्याची एक प्रत ग्रामपंचायत कार्यालयावर लावा अशा सूचना यावेळी जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शासनदरबारी पाठपुरावा करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सकाळपर्यंत देखील कमी जास्त प्रमाणात सुरूच होता. जवळपास ४४.४ मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात पावसाळ्याप्रमाणे अवकाळी पाऊस बरसत असल्याने बळीराजा चिंतेत आला आहे.